Monday 2 January 2012

555


1.       काय जामलेखक! काय म्हणताय? झाले का 555 रोजचे की कालचा पहिला दिवस गेला तसाच? कोरडा?  J !!! इतक्या लोकांनी लॉगिन करायचं म्हटलं की आमची खरीखुरी तारांबळ उडाली आणि वेबसाइट अडली. खरेतर नडली. अहो जामलेखनची वेबसाईट ती. जाम झाली. पण लॉगिनची तुम्ही फिकिर करू नका. ते आमच्यावर सोपवा. लॉगिनची सोय होईल लवकरच. आमची सगळी मंडळी सुरुवातीच्या पाहुणचारातच गुंतली आहेत. लग्नात भंबेरी उडते कि नाही? तशी आमची अवस्था झाली आहे. त्यामुळे समक्ष येण्यास विलंब झाला. आता मात्र आपण रोज भेटू. तुमचं चालू द्या. रोजचे 555. गुड लक.

Monday 19 December 2011

जामलेखन २०१२


जागतिक मराठी लेखन उत्सव अर्थात जामलेखन उत्सव हा मराठीतून लेखनाभिव्यक्ति करू इच्छिणार्‍या जगातल्या प्रत्येकाचा उत्सव आहे. ताई, माई, अक्का, दादा, अण्णा, आप्पा, विन्या, पम्या, विनी, सोनाली अशा घरातल्या मोठ्यातल्या मोठ्या आणि लहानातल्या लहान लिहिणार्‍या व्यक्तीसाठी हा उत्सव आहे. आपल्या मनातली गोष्ट सांगून पाहावी एकदा असं वाटणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी हा उत्सव आहे.
आठवतात का त्या कथा, कादंबर्‍या, ती नाटकं, चित्रपट, इतिहासातल्या त्या घटना आणि पात्रं ज्यांनी आपल्याला भारावून सोडलं? आठवतात त्या लेखकांशी झालेल्या भेटी आणि त्या सगळ्यातून ती जबर्दस्त उफाळून आलेली लिहायची इच्छा? आठवताहेत त्या टीव्हीवरच्या, रेडिओवरच्या लेखकांच्या, प्रकाशकांच्या मुलाखती? त्यातून झालेली ती इच्छा की आपणही काहीतरी लिहिलं पाहिजे? आठवताहेत त्या स्पर्धा शाळेतल्या, कॉलेजातल्या? आठवतात का ते दिवस जेव्हा आपण कामात आणि कुटुंबात व्यस्त होतो आणि राहून गेलं लिहायचं? ती संमेलनं, चर्चासत्रं, गप्पाटप्पा नदीकाठी जेव्हा मित्रांनी पाठीवर थाप देत सांगितलं होतं ‘लिही गड्या एकदा हे सगळं’? आठवते ती मैत्रिणींमध्ये आपण म्हणून दाखवलेली छोटीशी कविता? गणपती उत्सवात केलेलं नाटक, कॉलेजातल्या गॅदरिंगसाठी लिहिलेली एकांकिका? आपल्या आयुष्याला वळण देणारी ती माणसं, आपल्याला आह्वान देणारी माणसं, आपल्याला हरवणारी, आपल्यासमोर हरणारी ती सगळी माणसं, ती परिस्थिती, आपल्याला पडलेले प्रश्न, काही अजूनही अनुत्तरित तर काहींची आपल्याला सापडलेली उत्तरं या सगळ्याची करा नोंद, मांडा आपल्या आयुष्यावरचे आपले उपनिषद जगापुढे यावर्षीच्या जामलेखन उत्सवात.
कागदावर पेन गिरवा किंवा की-बोर्डवर बोटं आपटा....तुमच्यात असणा-या सृजनतेला मोकळं करा. डोक्यातल्या विचारांना शब्दांच्या माध्यमातून बाहेर काढा. खच्चून लिहा, अक्षरांच्या राशी रचा, विचारांनी पानंच्या पानं भरा, भावनांना शाईची वाट करून द्या, अलंकारांशी खेळा, स्वरव्यंजनांच्या माळा गुंफा, जामलेखन करा.
पन्नास हजार शब्दांची कादंबरी, चित्रपट पटकथा, नाटक, आत्मकथन, जीवनचरित्र नव्वद दिवसात लिहा. 1 जानेवारी ते 30 मार्च, 2012 (31 मार्च तारीख ठेवली तर एक्याणण्णव दिवस होतात ना???? म्हणून), या नव्वद दिवसांत पन्नास हजार शब्दांचे वर उल्लेखिलेले काहीही लिहा आणि व्हा यावर्षीचे जामलेखक.
थोडासा भागाकार वगैरे केलात तर दररोज लिहायचे आहेत केवळ 555 शब्द. बस्स्स! अगदी सोप्पं आणि सहज शक्य आहे. मग वाट कसली पाहताय? येऊ द्या बाहेर मनातील ती पात्रे, त्या घटना, ते संघर्ष, ते वादविवाद, ती स्वप्नं, ती मजा, ती मौज, ती सुखदु:खं, ते सगळे आठ रस (की नऊ, की बारा...की.....) आणि चार भाव. अवतरू दे शब्दांत तुमच्या मनातले जग. करा धमाल, खेळा शब्दांशी, अलंकारांशी, स्वरांशी, व्यंजनांशी. करू देत त्यांना धमाल तुमच्या मेंदूत आणि बाहेर पडू देत एक मस्त कलाकृती. एकदा पहा बनून विश्वकर्मा.
अलिबाबाची ही गुहा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 1 जानेवारी रोजी 00.00 वाजता उघडेल आणि 30 मार्चला 23.59 नंतर त्वरित बंद होईल. मग 1 तारखेला तयार व्हा ‘खुल जा सिमसिम’ म्हणायला आणि उतरा या अभूतपूर्व लेखनोत्सवात.